मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान राज्यात झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काल (सोमवार, 30 ऑक्टोबर, 2023) कायदा आणि सुव्यवस्थेची बैठक पार पडली. रात्री दहा ते अकरा अशी एक तास बैठक चालली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनांचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये आंदोलनादरम्यान मालमत्तेचा आणि जीवितहानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे, गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच,आंदोलनाचा गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, राज्यात हिंसक वातावरण तयार होत असेल, तर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या बैठकीला राज्यातले सर्व जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख उपस्थित होते.
महाराष्ट्रतील मराठा समाज आक्रमक झाला असून त्या संदर्भात माहिती घेऊन महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले. राज्यातील कायदा सुव्यवस्था या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. तर आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षण विषयी महत्वचा निर्णय होऊ शकतो त्या अनुषंगाने महत्वाची चर्चा करण्यात आली.
सीएम डीसीएम आणि पोलीसांच्या बैठकीत पोलीस महसंचालक यांनी दिवसभराच्या घडामोडींचा आढवा समोर ठेवला. मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत. या समाजकंटकांचा शोधण्याचं काम सुरु आहे. घर जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश या समाजकंटकांचा आहे. हे समाजकंटक आंदोलनांचा गैरफायदा घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली.
