राज्य शासनाकडून ‘सर्वोत्कृष्ट विद्यापीठ’ पुरस्कार मुंबई विद्यापीठाला जाहीर

यंदा राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार मुंबई विद्यापीठाला देण्यात आला आहे. नुकतेच राज्य शासनाने राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार जाहीर केले आहेत.

यामध्ये मुंबई विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान मिळवला आहे. तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मुंबई विद्यापीठाला 2021-22 या वर्षासाठी मिळाला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने दिलेल्या भरीव योगदानाची आणि केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत विद्यापीठास सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार म्हणून आर. डी. नेशनल महाविद्यालयातील विजेंद्र शेखावत यांची निवड करण्यात आली. तर, याच महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयातील विद्यार्थी ए. सेल्वा प्रकाश या विद्यार्थ्यास सर्वोत्कृष्ट स्वयंसेवकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन या सर्व विजेत्यांचा यथोचित सत्कार केला जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने पुरस्कार जाहीर केलेल्या वर्षात उल्लेखनिय कामगीरी केली आहे. विविध रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सर्वाधिक 78 हजार 945 युनिट रक्त जमा, सुमारे 2 कोटी रुपयाची पुरग्रस्ताना मदत, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अनेक गरजवंताना मदत, आर्सेनिक अल्बलचे वाटप, दोन हजाराहून अधिक गृहसंकुलाचे निर्जंतुकीकरण, मास्क आणि सेनेटायझरचे वाटप, दत्तक गावे, आरोग्य, नेत्र, लसीकरण शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, कोव्हिड लसीकरण मोहीम, विविध जनजागृतीचे कार्यक्रम, एड्स/ आरोग्य विषयक जनजागृती, पर्यावरण जनजागृती, बेटी बचाओ/महिला सशक्तीकरण, उद्योजकता विकास कार्यक्रम, अंमली पदार्थ आणि द्रव्यांचा गैरवापर रोखणे, अल्पसंख्याक हक्कांबाबात जनजागृती केली.