उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर संचालक काेण होणार, या चर्चवर आता पडदा पडला आहे. अजितदादांचे निकटवर्तीय रणजीत अशोकराव तावरे (रा. माळेगाव, ता. बारामती) यांची संचालकपदी वर्णी लागली आहे. त्यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. संचालकपदी रणजीत तावरे यांची सर्वानुमते निवड झाल्याने माळेगावात युवकांनी एकच जल्लोष केला.
काही दिवसांपुर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा अजित पवारांनी राजीनामा दिलेला होता. अजित पवारांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. तर अजित पवारांच्या जागेवर त्यांचा मुलगा पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रणजित तावरे यांची संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.
या निवड प्रक्रियेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा अनेक दिवस चालू होती. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी इच्छुक असलेले बारामतीतील मदनराव देवकाते यांचेही नाव घेतले जात होते. परंतु ही राजकीय पार्श्वभूमी विचारात न घेता अजित पवार यांनी तावरे कुटुंबीयांना संधी दिल्याचे स्पष्ट झाले.
रणजीत तावरे माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. प्रतिभा पतसंस्था आणि राजहंस दुध उत्पादक संघाचे ते अध्यक्ष आहेत.माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे आहेत.
