संगमनेरला चांगल्या बॅट्‌समनची गरज, फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोडा – राधाकृष्ण विखे पाटील

भाजप नेते आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संगमनेरमध्ये दौरे वाढवले आहेत. संगमनेरमधील घारगावमध्ये नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या परितोषिक वितरणाला हजेरी लावत मंत्री विखे यांनी जोरदार भाषण केले. ‘संगमनेर तालुक्याला चांगल्या फलंदाजाची गरज आहे. समोरून कसाही चेंडू आला तरी तो टोलवता आला पाहिजे. फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोडा’, अशा शब्दांत मंत्री विखे यांनी राजकीय फटकेबाजी केली.

थोरात-विखे हे राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यामुळे औचित्य कोणतेही असो दोघेही एकमेकांवर टीका-टिपण्णी करण्याची एकही संधी सोडत नाही. याचीच पुनरावृत्ती संगमनेर तालुक्यात बघायला मिळाली. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ विखे पाटलांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी थोरातांना डिवचत जोरदार राजकीय बॅटिंग केली.

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृत्यर्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे 21 वे वर्षे आहे. या स्पर्धेत तालुक्यासह पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. या नामदार चषक स्पर्धेचे पारितोषिक प्रदान राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेचे नियोजन आणि प्रतिसाद पाहून मंत्री विखे यांनी आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेत विखे-पाटलांनी केलेले तडाखेबाज भाषण विरोधकांची विकेट घेणारे ठरले. त्यामुळे संगमनेरमध्ये या भाषणाची चर्चा सुरू आहे.

या स्पर्धेतून चांगले फलंदाज गोलंदाज मिळाले आहेत.तसेही या तालुक्याला चांगल्या फलंदाजांची आवश्यकता आहे.समोरून कितीही आणि कसेही बाॅल आले तरी टोलावता आले पाहीजे फिल्डीगचे काम माझ्यावर सोडा असे सांगतानाच जनार्दन आहेर यांना सल्ला देताना आता एकच कोणता तरी संघ निश्चित करा आयपीएल सारखे संघ बदलू नका.आपले भविष्य घडविण्यासाठी निर्णय करण्याची वेळ आली असल्याचा मित्रत्वाचा सल्ला देवून एकप्रकारे भाजपात प्रवेश करण्याचे निमंत्रणच दिले.