आतापर्यंत आपण मुलांच्या नावापुढे वडिलांचे नाव लागलेले पाहत आलो आहोत. परंतु, आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले आहे, ज्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. फार बारकाईने हे धोरण आणले गेले आहे. याआधी मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगतले.
महिलादेखील समाजातील महत्त्वाचा घटक आहे, असे सांगताना अजित पवार म्हणाले की, मी अर्थमंत्री असताना विविध निर्णय घेतले. एखाद्या पुरुषाने सदनिका विकत घेतली तर त्यावर सहा टक्के कर लावला जातो, जर महिलेच्या नावावर सदनिका घेतली तर केवळ पाच टक्के कर लावला जातो. त्यामुळे इथून पुढे पती घर घ्यायचा विचार करत असेल तर पत्नीने पैसे वाचविण्यासाठी हा पर्याय पतीपुढे ठेवायला हरकत नाही, असेही अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. महिला धोरणाच्या बाबतीत टप्प्याटप्प्याने माहिती देऊ, असे त्यांनी जाहीर केले.
आपण महिलांना संधी दिली. आपण चौथं महिला धोरण आणलं. महिला मंत्री असल्याने तिलाही त्यातील माहिती होती. तुम्हाला लवकरच काही माहिती मिळेल. आधी अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं. आता इथून पुढं आधी मुलाचं किंवा मुलीचं नाव, नंतर आईचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव आणि मग आडनाव असं संपूर्ण नाव असणार आहेत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, आज सर्वच क्षेत्रात महिला पुढाकार घेत आहेत. स्वतःचं कुटुंब कशाप्रकारे सांभाळायचं याची जाणीव महिलांना झाली आहे. त्यामुळेच महिला आपली आर्थिक गरज भागविण्यासाठी बचतीकडे वळल्या आहेत. परंतु अल्पबचतीमुळे त्यांची आर्थिक गरज पूर्ण होऊ शकत नाही, महिलांना अधिक सक्षम कसे बनविता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सडक अर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात सहभाग घेऊन या महिलांशी संवाद साधताना आदिती तडकरे यांनी म्हटलं होतं.
