राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल,असा विश्वास राज्यपालर मेश बैस यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.
राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, नियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि बाल वैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला चालना मिळते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी शाळांमधून अशा प्रदर्शनाचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. प्रत्येक व्यक्तीत असा गुण असतो आणि इच्छाशक्तीच्या माध्यमातून तो समोर येतो. बाल वैज्ञानिकांच्या या प्रदर्शनातूनही अशाचप्रकारे भविष्यातील वैज्ञानिक तयार होतील, त्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून नवे पेटंटची नोंद केली जाईल आणि हेच बाल वैज्ञानिक राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीत हातभार लावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे बाल विज्ञान प्रदर्शन ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ या विषयावर आधारित आहे. भारतात स्थानिक खेळण्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ही खेळणी विज्ञान विषयावर आधारित असल्यास मनोरंजनातून विज्ञानाविषयी आकर्षण निर्माण होईल. शाळांमधूनही अशा प्रदर्शनाचे आयोजन झाल्यास विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता वाढीस लागेल. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीचे प्रयत्न न थांबविता संशोधनाचे प्रयत्न सुरू ठेवावे, असे आवाहन राज्यपालरमेश बैस यांनी केले. पुणे हे संस्कृती आणि शिक्षणाचे केंद्र असल्याचे नमूद करतांना डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वैज्ञानिक क्षेत्रात राज्याचे नाव जगभरात पोहोचविले, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले.
