घटनाबाह्य काम आम्ही केलेले नाही; मेरीट प्रमाणे निकाल अपेक्षित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी व कार्यालयांवर मंगळवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली. जोगेश्वरी जमीन घोटाळा प्रकरणात ही धाड टाकल्याचं सांगितलं जात आहे. या धाडीनंतर विरोधकांकडून आकसापोटी कारवाई करण्यात आल्याची तक्रार केली जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. ‘कर नाही त्याला डर कशाला?’ असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरच हल्लाबोल केला आहे.

वायकर यांच्यावरील ईडीच्या छापेमारीविषयी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता. त्यांनी ईडी ही काही राज्याच्या अखत्यारीत नाही तर केंद्राच्या अखत्यारीत असल्याची तात्काळ प्रतिक्रिया दिली. विरोधकांच्या सूडबुद्धी राजकारणाच्या आरोपाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. कर नाही त्याला डर कशाला, होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी, अशी प्रतिक्रिया त्यांनी लागलीच दिली. हे सरकार सूडबुद्धीने वागत नाही. आकासापोटी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. करणार नाही, असे ते म्हणाले.

कोविडमध्ये त्यांनी किती पैसे खाल्ले हे सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं रेकॉर्डवर आहे. मग आम्ही त्यांना काय म्हणायचं? कफन चोर म्हणायचं की खिचडी चोर म्हणायचं? पुराव्याशिवाय आरोप करू नये. कुणालाही घाबरण्याची काय गरज आहे? जे काय असेल ते दूध का दूध, पानी का पानी होईल. आम्ही आकसापोटी कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्याला पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत. विरोधकांनी विरोध केलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देतोय. त्यामुळेच त्यांना पोटशूळ उठला आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

आमदार अपात्रता प्रकरण निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही. विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी झाली असून उद्या निकाल येईल. बहुमताला लोकशाहीत महत्त्व आहे . विधानसभा आणि लोकसभेत बहुमत आहे. आमच्याकडे अधिकृत चिन्ह आहे. मेरीटप्रमाणे निकाल अपेक्षित आहे. नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही. घटनाबाह्य काम आम्ही केलेलं नाही.