देशात 24 तासात कोविडमुळे 4 जणांचा मृत्यू, 605 नवीन प्रकरणांची नोंद

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अपडेटनुसार, देशात गेल्या 24 तासांमध्ये 605 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाच्या संक्रमणामुळे 4 लोकांना त्यांचा जीव गमवावा लागणार आहे. केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, कोविड संसर्गामुळे मृत्यू झाल्यांमध्ये केरळमधील दोन आणि कर्नाटक आणि त्रिपुरातील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या 4 रूग्णांच्या मृत्यूंमुळे मृतांची संख्या 5,33,396 वर पोहोचलीये.

महाराष्ट्रात सोमवारी (8 जानेवारी 2024) राज्यात 61 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली, तर 70 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत जेएन.1 व्हेरिएन्टच्या 22 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील जेएन.1 व्हेरिएन्टच्या रुग्णांची संख्या 250 वर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. पुण्यात एकूण 150 बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यापाठोपाठ नागपूरमध्ये 30 रुग्ण, मुंबईत 22 रुग्ण, सोलापुरात 9 रुग्ण, ठाण्यात 7, जळगावात 4, अहमदनगरमध्ये 3 रुग्ण, बीडमध्ये 3 रुग्ण, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 रुग्ण, कोल्हापूरमध्ये 2, नांदेडमध्ये 2, नाशिकमध्ये 2, धाराशिवमध्ये 2, अकोल्यात 1, रत्नागिरीत 1, साताऱ्यात 1, सिंधुदुर्गात 1 आणि यवतमाळमध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धोका पाहता धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, हे धोक्याचं लक्षण आहे. वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये नव्या व्हेरियंटचा धोका वाढतो. या नवा व्हेरियंट आणि ओमायक्रॉन या दोन्ही विषाणूंमध्ये साम्य असलेली एक गोष्ट म्हणजे हे दोन्ही अत्यंत संसर्गजन्य आहेत. या विषाणूचे जसजसे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. तसतसा हा विषाणू पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य होत असल्याचे दिसून येत आहे.

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च ने दिलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारीपर्यंत देशात लसीचे 11,838 डोस देण्यात आलेत. सध्या जानेवारी महिना सुरु असून देशात अनेक ठिकाणी थंडीचं वातावरण आहे. या परिस्थितीत जसजसा हिवाळा सुरू होतोय तसतसं आरोग्य तज्ञांना विषाणूजन्य संसर्ग, इन्फ्लूएंझा आणि कोविड-19 प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्याचं दिसून येतंय.