बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा आमदार अपात्रतेचा निकाल आज लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालाची सुनावणी करणार आहेत. दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलाय. म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार असे ते सांगत आहेत. आजही आमचा व्हीप त्यांना लागू आहे. तशाच मेरीटवर आम्हाला निकाल अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आज अध्यक्षांचा अधिकृत निर्णय आल्यानंतर आपल्यासमोर भाष्य करेन आणि आमची भूमिका मी सांगेन. मी इतकंच सांगतो की शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने दिली.पक्ष, चिन्ह आमच्याकडे आहे त्यामुळे निकालही आमच्या बाजूनं लागे. बहुमताच्या जोरावर विधानसभेत ६७ टक्के बहुमत आमच्याकडे आहे तर लोकसभेत ७५ टक्के बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली आहे.
त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले. अध्यक्ष अधिकृतपणे आले, रात्री लपून आले नाहीत. दिवसाच्या उजेडामध्ये आले. त्यांच्या मतदारसंघांमध्ये जे काम सुरू आहे कोस्टल रोड, मरीन ड्राईव्ह मी स्वतः पाहणी केली होती. ते आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जे काही काम मतदार संघातील इतरही काही विषय होते आणि अधिकार्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली. लपून-छपून बैठक झालेली नाही. त्यामुळे जे लोक स्वतःच्या मनात चांदणं लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये त्या करत नाही. आमचं काम अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही सत्य नाही, जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ही संस्था चांगली असते. जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकार होतात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आज पडणार, उद्या पडणार असं सांगत आहेत. अनेक ज्योतिषी आणले काही उपयोग झाला नाही. सरकार मजबूत झालं, त्यामुळे त्यांच्या (ठाकरे गट) पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांनी जरा आत्मपरीक्षण केलं पाहिजे मग आमच्यावर आरोप केले पाहिजेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आजही आमचा व्हिप त्यांना लागू आहे. आम्हाला मेरिटवर निकाल अपेक्षित आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
