वडिलांसारखी केवळ वस्त्रं घालून वारसा सांगता येत नाही – नितेश राणे

सोमवारी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुसरीकडे उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात पोहोचले होते. उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह वैदिक मंत्रोच्चारात श्रीरामाची पूजा केली. यानंतर रामाची आरतीही करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान यावेळी उध्दव ठाकरेंच्या या नव्या लूकची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नितेश राणे म्हणाले की, वडिलांसारखी केवळ वस्त्र घालून वारसा सांगता येत नाही, वडिलांसारखे नेतृत्त्व, कर्तृत्त्व, विचारधारा जपायची असते, नव्हे तर ती आणखी पुढे न्यायची असते, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे. मध्येच यूटर्न घेतला नसता तर अयोध्येत दर्शनापासून तोंड लपवायची पाळी आज आली नसती, अशी जोरदार टीकाही नितेश राणेंनग उध्दव ठाकरेंवर केली आहे.

याशिवाय ‘राम मंदिर राजकीय इच्छा असती तर या पूर्वी केले असते मात्र ती नव्हती. जेव्हा भाजपची सत्ता आली आणि मोदी पंतप्रधान झाले तेव्हा मंदिर वही बनायेंगे आणि भव्य मंदिर बानायेंगे असे जाहीर करून मोदींनी ते उभारून दाखविले. मात्र काँग्रेसची सत्ता असताना रामजन्म भूमीवर प्रश्न निर्माण केला होता. वक्फ बोर्ड जी भूमिका घेते तीच भूमिका आता उध्दव ठाकरे घेत आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर साठी जे केले ते सर्व उध्दव ठाकरे यांनी घालविले आहे.’ अशी टीकाही नितेश राणेंंनी केली.

संजय राऊतांवर टीका करताना नितेश राणे म्हणाले आहेत की, “ज्यांनी प्रभू रामचंद्रांचा अवमान करून हिंदुत्ववादी भूमिका गुंडाळून ठेवली ते आज राम कोण? आणि रावण कोण? हे सांगत आहेत. संजय राऊत यांची भूमिका तर रामायणातील कपटी शूर्पणखेप्रमाणेच राहिली आहे. संजय राऊत यांनी यापूर्वीही अनेकवेळा नाक कापून घेतलं पण शूर्पणखेप्रमाणे त्यांचा अहंकार काही संपला नाही. आजही नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत यांनी अहंकाराची भाषा केली. पण राऊतांनी हे लक्षात ठेवावं शूर्पणखेचं नाक लक्ष्मणानं कापलं होतं, येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या अहंकाराचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही”.