‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कारासाठींच्या यादीत गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींगसह एरोबिक्स, ॲक्रोबॅटीकचा खेळांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. फेर समाविष्ट केलेल्या क्रीडा प्रकारातील अर्ज मागवून घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता दिले आहेत.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या खेळांच्या संघटनांनी त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याबाबत तसेच त्यांच्या खेळांचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी पात्र क्रीडाप्रकारांमध्ये समावेश करण्याबाबत क्रीडा संचालनालयास पत्रव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, उद्योगमंत्री उदय सामंत, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), अरुण केदार, अजित सावंत (कॅरम), संजय सरदेसाई, संजय माधव (पॉवर लिफ्टिंग), महेंद्र चेंबुरकर ( जिम्नॅस्टिक्स), देवेंद्र जोशी, क्षितीज वेदक (बिलियर्ड्स आणि स्नूकर), विजय झगडे, राजेश सावंत (बॉडीबिल्डींग), विठ्ठल शिरगावकर (मॉडर्न नेन्थोलॉन) आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोणताही खेळाडू तो खेळत असलेल्या क्रीडा प्रकारात यश मिळविण्यासाठी त्याची उमेदीची वर्षे खर्च करतो. आपले सर्वस्व पणाला लावतो. आपल्या कौशल्य, मेहनतीच्या बळावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल करतो. अशा खेळाडूंच्या क्रीडा कामगिरीचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने शिवछत्रपती पुरस्कार देण्यात येतात, त्यामुळे कुठल्याही खेळावर आणि खेळाडूंवर अन्याय होऊन चालणार नाही.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी पात्र असलेल्या 44 खेळांपैकी, वगळण्यात आलेल्या इक्वेस्टेरियन, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर व यॉटींग या सात खेळांना पुन्हा यादीत सामावून घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जिम्नॅस्टिक खेळामधील उपप्रकार असणाऱ्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या पात्र यादीत नव्याने सामावेश करण्याचे ठरविण्यात आले.या खेळांचा पुन्हा पात्रता यादीत समावेश करण्यासह जिम्नॅस्टिक खेळामधील उपप्रकार असणाऱ्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या पात्र यादीत सामावेश करावा. तसेच सन २०२२-२३ या वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यांची मुदत २२ जानेवारीपर्यंतच होती. ही मुदत सुध्दा पुन्हा वाढवून या नव्याने समाविष्ट केलेल्या खेळांसाठीचे अर्ज ऑनलाईन मागविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
