मनोज जरांगेंच्या आंदोलनावर चांगला मार्ग निघाला; अध्यादेश दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रात सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन संपले आहे. मनोज जरंगे पाटील यांनी आज आंदोलन संपल्याची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले आहे. महाराष्ट्र सरकारने जरांगेंच्या मागणीनुसार नवीन अध्यादेश दिला आहे. दरम्यान यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मला अतिशय आनंद आहे की, काल जे आंदोलन, उपोषण सुरु होतं त्यावर अतिशय चांगला मार्ग निघाला त्याची सांगता झाली आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने या संदर्भात अतिशय सकारत्मकता दाखवली होती. आम्हाला आज आनंद आहे की, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज प्रश्न सुटलेला आहे. मी मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचेही आभार मानतो. त्यांनी हा मार्ग स्वीकारला. आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की, जो काही मार्ग आहे तो कायदेशीर काढावा लागेल, संविधानाच्या आधारावर काढावा लागेल, म्हणून आपल्याला सरसकट करता येणार नाही. पण ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्त नात्यातील लोकांना आपल्याला ते देता येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की मला आनंद आहे, की मराठा आरक्षणावर सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. मी मनोज जरांगे यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. या प्रश्नावर कायदेशीर मार्ग काढावा लागेल हे आम्ही आधीपासून म्हणत आहोत. यामुळे नोंदी असलेल्या रक्ताच्या नात्यातील लोकांना प्रमाणपत्र कसे देता येईल हा मार्ग स्वीकारला आहे, त्यामुळे मराठा समाजाचा प्रश्न सुटेल. हा निर्णय घेत असताना आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ दिलेला नाही. राज्यातील सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर छगन भुजबळ यांचंदेखील समाधान होईल. कारण पहिल्या दिवसापासून आमची ही भूमिका आहे, ओबीसी समाजावर अन्याय होऊ द्यायचा नाही आणि आम्ही तो होऊ दिलेला नाही”, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. आंदोलकांवरील गुन्हे परत घेत आहोत. पण पोलिसांना ज्यांनी मारहाण केली आहे, ज्यांनी घरे जाळली आहेत अशा लोकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मागणी झालेली नाही आणि त्यावर काही कारवाई झालेली नाही, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.