स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या गळ्यात गळे घातलेल्या आदित्य ठाकरेंना बघून स्वर्गातून बाळासाहेबांना काय वाटेल? : फडणवीस

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अतिशय निर्लज्ज विधान केले आहे. ज्याचे उत्तर त्यांना महाराष्ट्राची जनताच देईल. स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे एकमेव नेते आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कारावास भोगला, स्वातंत्र्यानंतर उपहासाचा काराास भोगला आणि आजही त्यांचे विचार कारावासात टाकण्याचे प्रकार काँग्रेसचे नेते करत आहेत. आणि असे विधान करणाऱ्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे सहभागी होतात, आणि त्यांच्या गळ्यात गळे घालतात, त्यावेळी स्वर्गातून हे बघत असताना बाळासाहेबांना किती यातना होत असतील? असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. “वारसा विचारांचा : हिंदुत्व : स्वातंत्र्यवीर सावरकर ते हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” या कार्यक्रमात ते बोलत होते.


“मला स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक स्वतंत्रता सेनानीविषयी मनापासून आदर आहे. मात्र अंदमान येथे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दुहेरी काळापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारखा एक तरी नेता मला दाखवून द्या.” असे देखील ते यावेळी म्हणाले.

बाळासाहेबांशी नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का ?

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जाज्वल्य अभिमान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना होता; सावरकरांच्या विरुद्ध जर कोणी एक शब्दही बोलला तर त्याला चपखल असे उत्तर शब्दातून आणि कृतीतूनही मिळत होते. आणि आता मात्र हिंगोलीमध्ये राहुल गांधी सावरकरांबद्दल इतकं नीच बोलतात, आणि त्यांच्या गळ्यात गळे घालून आदित्य ठाकरे ज्यावेळी पदयात्रा करतात, हे बघून स्वर्गातून बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल? मी विनंती करेन, कि तमुचं आमचं पटत नसेल, तुम्ही विचार सोडले म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं. तुम्ही आम्हाला शिव्या द्या. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिव्या देणाऱ्यांसोबत तुम्ही गळ्यात गळे घालून चालता, तेव्हा बाळासाहेबांशी नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का ? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.



“नातं हे रक्तानी सिद्ध होत नसतं. ते विचारांनी सिद्ध होतं. बाळासाहेबांशी आमचं विचारांचं नातं आहे. आणि जो जो विचारांचं नातं याठिकाणी सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी आहे. आणि म्हणूनच इथे बाळासाहेबांची शिवसेना उभी झाली. रक्ताने एकनाथ शिंदे कदाचित बाळासाहेबांचे कुणी नसतील, मात्र विचारांनी ते बाळासाहेबांचे खरे अनुयायी आहेत.” असं देखील ते यावेळी म्हणाले.