स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे योजनेतून शेतकऱ्यांना 23 कोटी 37 लाख निधी वितरित – कृषीमंत्री धनंजय मुंडे

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतर केल्यानंतर प्रथमच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या योजनेतील लाभार्थींना वितरित करण्यासाठी 23 कोटी 37 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पूर्वी सदर योजना ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना या नावाने ओळखली जायची. या अंतर्गत विमा सुरक्षा म्हणून अपघातग्रस्त शेतकऱ्यांना अपघातातील उपचारासाठी किंवा मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य म्हणून ठराविक रक्कम देण्यात येत होती. मात्र धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळात या योजनेचे विमा योजनेतून सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतरण करण्यात आले.

यापूर्वी, महायुती सरकारच्या काळात या योजनेचे विमा योजनेतून सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतरण करण्यात आले होते. यादरम्यानच्या खंडित कालावधीतील अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना काही दिवसापूर्वीच 49 कोटी रुपये इतक्या लाभाचे वितरण करण्यात आले होते.परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबाने धनंजय मुंडे यांच्या जनता दरबारात भेट घेऊन निधी अभावी लाभ मिळाला नसल्याची तक्रार केली होती. यानंतर मुंडे यांनी या योजनेचा आढावा घेऊन खंडित कालावधीतील सर्व प्रकरणे निकाली काढण्यासाठी 49 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला.

राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून 23.37 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो. काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.