शरद पवार बदला घेणार, अजितदादांच्या पुतण्याला फोडणार

महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्याचे राजकारण नेहमीच चर्चेचे राहिले आहे. शरद पवार यांनी अनेकदा काका-पुतण्याच्या राजकारणाचा वापर केला. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांना उभे केले. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांना उभे केले. नियतीने त्यांनाच धडा देत अजित पवार हे त्यांचे पुतणे त्यांना सोडून गेले. मात्र, आता शरद पवारांनी याचाही बदला घेतला आहे. अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना त्यांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले. पर्यायाने पवार कुटुंबावरही याचे परिणाम जाणवू लागले. आता अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी काकाऐवजी आजोबांना साथ देण्याचं ठरवलं आहे. उद्योजक असणारे युगेंद्र पवार हे आता राजकारणात येणार असल्याची माहिती आहे. युगेंद्र पवार यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यलयाला भेट दिली. तिथल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र आहेत. युगेंद्र हे व्यावसायिक आहेत. शरयू फाऊंडेशनच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. शरयू अ‍ॅग्रो कंपनीचे ते सीईओ आहेत. या शिवाय बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलाचे ते खजिनदार आहेत. बारामती कुस्तीगीर परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युगेंद्र यांनी कुस्ती सामन्यांचं आयोजन केलं होतं तेव्हापासूनच ते शरद पवार गटात सक्रीयपणे सहभागी होतील, अशी चर्चा होती.

शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शरद पवारांना युगेंद्र पवार यांच्या पक्षप्रवेशाविषयी विचारणा करण्यात आली. युगेंद्र पवार आधी अजित पवार गटात होते, आता ते तुमच्याकडे येताहेत, तुम्हाला काय वाटते, असे पवारांना विचारण्यात आले. यावर शरद पवारांनी मिश्कीलपणे भाष्य केले. मुळात युगेंद्र पवार हे राजकारणात आहेत, हेच मला माहिती नव्हते. ते व्यावसायिक आहेत. त्यांचा स्वत:चा मोठा व्यवसाय आहे.
अजित पवार यांनी याबाबत पूर्वीच भूमिका व्यक्त केली आहे. बारामतीच्या निवडणुकीवेळी सगळेजण माझ्याविरोधात प्रचार करतील. तेव्हा तुम्ही मला एकटं टाकू नका. तुमची साथ आहे तोपर्यंतच मी तडफेने निर्णय घेऊ शकतो, अशी भावनिक साद अजित पवारांनी कार्यकर्त्यांना घातली होती.पत्रकारांशी बोलताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार लोकसभेसाठी आपला प्रचार करणार असल्याचे सांगितले. युगेंद्र व्यवसायात हुशार आहे, शेतकऱ्यांशी त्याची नाळ जोडलेली आहे, सुसंस्कृत आहेत असे कौतुक केले.