बारामतीचे वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही. बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवारांवर टीका केली होती. पवारांच्या तंबूत घबराट पसरल्याने आता याच जानकरांना मदतीची साद शरद पवार गटाकडून घातली गेली आहे.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महादेव जानकर यांना जाहीर आवाहन करत महाविकास आघाडीमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. याच जानकरांचे बारामतीतील कार्यालय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडले होते.
शरद पवार हे कालबाह्य ठरलेले नेते आहेत. बारामतीची पालखी वाहणार नाही, असे जानकरांनी अनेक वेळा सांगितले. तरीदेखील त्यांना पायघड्या घालण्यामागचे कारण शरद पवार तंबूत पसरलेली घबराट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लढण्याची चर्चा सुरू झाल्यापासून शरद पवार गटाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव म्हणजे शरद पवार गटाच्या राजकारणाचा अंत मानला जाईल. त्यामुळे धास्तावलेल्या शरद पवार गटाने अगदी कट्टर शत्रूपुढेही मान झुकवली असेच बोलले जात आहे.
‘महाराष्ट्राला बारामतीची भानामती झाली आहे;ही भानामती जानकर नावाचा जादूगार संपवणार!’ अशा वल्गना महादेव जानकर करत असायचे. पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांनी शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरूद्ध भाजपाच्या मदतीने निवडणूक लढवली होती. सुप्रिया सुळे यांना चांगली लढत दिली होती. अजित पवारानी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यामुळे पराभव होता होता वाचला. मात्र यामुळे जानकर यांचा आत्मविश्वास भलताच वाढला. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मिळालेली मते आपलीच आहेत असे त्यांना वाटू लागले आहे.
महादेव जानकर हे धनगर समाज चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व आहे. शरद पवार यांच्यामुळेच धनगर समाजाचं राजकीय, आर्थिक, सामाजिक नुकसान झालेलं असुन शरद पवारांना राजकारणातून संपविल्याशिवाय धनगर समाजाचा विकास होणार नाही, अशा प्रकारची भूमिका महादेव जानकर यांच्याकडून सातत्याने मांडण्यात येते. पण बारामतीतील धनगर मतांवर डोळा ठेवून शरद पवार गटाने आता सुप्रिया सुळे यांना मदत व्हावी यासाठी जानकरांना निमंत्रण दिले आहे.
