बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारच, सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितले

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद- भावजयीमध्येच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लढणार आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे मी अधिकृतपणे सांगतो की सुनेत्रा पवार या बारामतीच्या उमेदवार असतील, असे सांगितले आहे. तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

संसदेत मी जाणार आहे की माझा नवरा जाणार आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याने भाषण केल्यावर कसे चालेल. मी सदानंद सुळे यांना भाषण करायला पाठवते. तुम्ही मला मतं द्याल का? असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी एका भाषणात केले होते. त्यांच्या या विधानावर सुनिल तटकरे म्हणाले, आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत. आम्ही वैचारिक लढा उभा करत आहोत. एका महिलेने दुसऱ्या महिलेबाबत असे वक्तव्य करावं हे दुर्दैवी आहे. कुठल्याही महिला खासदाराचा पती भोजनालयात बायकोची पर्स घेऊन बसलेला मी पाच वर्षांत पाहिलेला नाही. पण सुप्रिया सुळे यांनी केलेलं विधान हे थेट सुनेत्रा पवार यांच्यासाठी होतं, असं मी मानतो. मला नम्रपणे सांगायचं आहे की अजित पवार गेल्या ३५ वर्षांपासून भाषण करत आहेत. सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठीदेखील तीन वेळा अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. मग हे सारं का विसरावं? नैराश्य येऊ शकतं. पण हे नैराश्य एवढ्या पराकोटीच्या वक्तव्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटलं नव्हतं, असे तटकरे म्हणाले.

सुनेत्रा पवार यांनी बारामतीत खूप मोठं सामाजिक काम केलेलं आहे. बारामती टेक्स्टाईल, बारामती क्लब, अनेक शैक्षणिक संस्था, विद्या प्रतिष्ठान असेल या साऱ्यांत सुनेत्रा पवार यांनी काम केलेलं आहे. सुनेत्रा पवार यादेखील भाषण करतात. त्या कधीही पर्स घेऊन कुठल्या कार्यक्रमाला गेल्याचं मी पाहिलेलं नाही. ज्या दिवशी सुनेत्रा पवार संसदेत जातील तेव्हा त्या उत्तम पद्धतीने बोलतील याची मला खात्री आहे, असेही तटकरे म्हणाले.