शरद पवारांसारखा माणूससुद्धा जातीवर येतो… जरांगेंच्या बामनी कावावर देवेंद्र फडणवीस यांचं थेट उत्तर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार मनोज जरांगे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले. याच आरोपांवर आता देवेेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. ही भूमिका मांडताना फडणवीस यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या लोकसभेचा महासंग्राम या कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं. शरद पवार यांचा पक्ष आहे. त्यांनी कुणालाही तिकीट द्यावं. कुणाला ते तिकीट देत असतील तर आमची ना नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.मी मोठेपणा करणार नाही. करायचं नाही. पण एक गोष्ट सांगतो. भाजपने जेव्हापासून संभाजीराजे, उदयनराजे असतील किंवा इतर राजघराणे सोबत जोडली, तेव्हा शरद पवार यांना या राजघराण्याचं महत्त्व पटलं. तोपर्यंत त्यांना या राजघरणाच्याचं महत्त्व पटत नव्हतं. जो सन्मान या राजघराण्याला द्यायला हवा होता तो दिला नाही. ठिक आहे. आता देत आहेत तर चांगलं आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर थेट उत्तर देणं टाळलं होतं. अखेर त्यांनी यावर भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यावेळी त्यांना मनोज जरांगे यांच्या ‘ब्राम्हणी कावा’ आणि ‘सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न’ या आरोपांवर प्रश्न विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यावर जरांगे पाटील स्वतःच बोलले आहेत. ते म्हणाले की, ‘मी खूप दिवस उपाशी होतो त्यामुळे माझा बोलताना ताबा सुटला.’ जरांगे पाटील यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिल्यामुळे त्याकडे लक्ष देत नाही, तुम्हीदेखील (प्रसारमाध्यमं) जरांगे- वक्तव्य सोडून द्या, त्यांना जाऊ द्या. मनोज जरांगे नवीन आहेत. परंतु, राजकारणातले वरिष्ठ लोकही असं वागतात.

‘शरद पवारांसारखा माणूससुद्धा जातीवर येतो. आम्ही जेव्हा कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेचं तिकीट दिलेले तेव्हा शरद पवार काय म्हणालेले ते आठवा. शरद पवार म्हणालेले की, ‘पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे आणि आता पेशवे छत्रपती नेमायला लागलेत.’ म्हणून मला जरांगेंच्या वक्तव्याचं काही वाटत नाही.’असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपल्याला जातीवरुन लक्ष्य केलं जातंय याकडे फडणवीस यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधलं. “मी मागेही बोललो होतो की माझी जात लपली नाही. मी ती लपवून ठेवली नाही. मला त्यात अपराधी वाटत नाही. तसं असण्याचं कारण नाही,” असं फडणवीस म्हणाले. “माझी जात मागे टाकून महाराष्ट्राने मला स्वीकारलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाने मला स्वीकारलं आहे. मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. महाराष्ट्राने स्वीकारलं असून कोण मला प्रमाणपत्र देऊ शकतं? कुणाला हा अधिकार आहे प्रमाणपत्र द्यायचा?” असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.