अल्पावधीतच क्रिकेटपटू गौतम गंभीरचा राजकारणाला रामराम

दिल्ली भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी राजकारणाला अल्पावधीतच रामराम केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना ही विनंती करणारी पोस्ट लिहिली आहे. मी आता क्रिकेटवरच लक्ष्य केंद्रीत करु इच्छितो असं गौतम गंभीर यांनी म्हटलं आहे. मला सगळ्या राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा मी आता क्रिकेटवर लक्ष्य करु इच्छितो अशी पोस्ट गौतम गंभीरने केली आहे. गौतम गंभीर राजकारणात सक्रिय होता. त्याने अशा प्रकारे राजकारण सोडल्याने राजकीय वर्तुळातही आश्चर्य व्यक्त होतं आहे.

राजकारणाला रामराम म्हणण्यापूर्वी गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये गंभीरने म्हटलंय की, मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट संदर्भातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.

क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रिकेटर गौतम गंभीरने राजकारणातही दमदार पदार्पण केले. भव्य रोड शो केले. प्रचंड मोर्चे काढले. आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गंभीरने पूर्व दिल्लीच्या जागेवर मोठा विजय नोंदवला होता. त्याने 3 लाख 90 हजारांच्या मोठ्या फरकाने काँग्रेस नेते अरविंदर सिंग लवली यांचा पराभव केला होता. गंभीर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि जिंकला.

गौतम गंभीरच्या क्रिकेट कारकिर्दिबाबत बोलायचं तर, टी२० वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप संघातील सदस्य होता. दोन्ही स्पर्धांमध्ये गौतम गंभीरने मॅच विनिंग खेळी केली होती. टी२० च्या अंतिम फेरीत त्याने ५४ चेंडूत ७५ धावा केल्या होत्या. तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने ९७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. आयपीएलमध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात केकेआरने दोनदा जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंटचा मार्गदर्शकही राहिला आहे. आता पुन्हा एकदा त्याच्याकडे शाहरूख खानच्या मालकीच्या केकेआरची जबाबदारी आली आहे.