पुणे : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी साेलापूर जिल्ह्यातील कन्नड भाषिक प्रदेशावरही हक्क सांगितल्यावर राज्यात संतापाची लाट उसळली. मात्र, राज्याचे जाणते राजे म्हणविले जाणारे शरद पवार यांच्या वक्तव्याने सर्वांना अचंबित केले आहे. बेळगावसारखा सुपीक बागायती भाग घेऊन दुष्काळी सोलापूर कर्नाटकला देण्यास तर ते तयार नाहीत ना? अशी टीका होऊ लागली आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, बेळगाव, कारवार, निपाणी आणि हा सगळा परिसर ते जर सोडणार असतील तर काय त्यांना देता येईल त्याची चर्चा होऊ शकते. पण काही न करता कशाचीही मागणी करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. त्याला आमचा पाठींबा नाही.
मात्र, मुळात महाराष्ट्राचा काेणताही भाग कर्नाटकला द्यायचाच का? अशी चर्चा हाेत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 हुतात्म्यांनी बलिदान केले. तरीही तत्कालिन काॅंग्रेसच्या सरकारमुळे बेळगाव, निपाणी, कारवार यांसह सुमारे आठशे पासष्ट मराठी भाषिक सीमावर्ती भागातील मराठी गावे कर्नाटक राज्याला देण्यात आली. बिदर, भालकी, संतपूर, हुमनाबाद, बुऱ्हाणपूर, सोंसर, भुलताई, भैंसदे हा प्रदेश वादग्रस्त सीमाभाग म्हणून ठेवण्यात आला. कर्नाटकाने पुन्हा एकदा साेलापूर जिल्ह्याचा प्रश्न उपस्थित करून हा भाग देखील वादग्रस्त ठरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याला शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे बळ मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाजन आयाेगापुढे बाजू मांडतानाच कर्नाटकनेअक्कलकोट तालुका, दक्षिण सोलापूर तालुका, सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर तालुका यांच्यावर दावा केला हाेता. मात्र, त्यानंतर हा दावा थंडबस्त्यात टाकला हाेता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावर बाेलल्यावर शरद पवारांची पुन्हा चर्चेची तयारी संतापजनक असल्याचे साेलापूर जिल्ह्यातील अभ्यासकांचे मत आहे.

मुळात माेजून मापून बाेलणारे शरद पवार असे का म्हणाले असतील हा प्रश्न आहे. याचे कारण तेथील भाैगाेलिक परिस्थितीत दडले आहे. साेलापूर जिल्ह्यातील हा भाग दुष्काळी मानला जातो. याउलट बेळगाव, कारवार, निपाणी हा सगळा अत्यंत सुपीक भाग आहे. निपाणीतील तंबाखूची शेती प्रसिद्ध आहेच. याशिवाय बेळगावमध्ये ऊस बागायती मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात सिंचनाच्या सुविधाही आहेत.
एका राजकीय अभ्यासकाने तर पवारांच्या या वक्तव्यामागे उजनी धरणातील पाण्याचा वाद असल्याचेही सांगितले आहे. साेलापूर जिल्ह्यातील भागाला उजनी धरणाचे पाणी द्यावे लागते. यातील काही भाग जर कर्नाटकमध्ये गेला तर हे पाणी बारामती तालुक्यासाठी वापरता येऊ शकते, असाही पवारांचा इरादा असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
