मुंब : श्रध्दा वालकर प्रकरणात तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी काेणाचा दबाव हाेता? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे मुंब अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.
श्रद्धाने नोव्हेंबर २०२०मध्ये आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. श्रद्धाने तक्रारीत आफताबापासून जीवाला धोका आहे. तो तिच्या शरिराचे तुकडे तुकडे करण्याची धमकी देताे, अशी तक्रार तिने वसईच्या तुळींज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्याची दखल घेतली नाही.

यावरून शेलार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, दखलपात्र गुन्हा अदखलपात्र करुन हा विषय “टेबलावर” मिटवण्यात आला का? तक्रार मागे घेण्यासाठी श्रध्दावर दबाव आणला गेला का? गंभीर गुन्हा घडू शकतो याची स्पष्ट कल्पना पिडीता देत असल्याने गुन्हा दाखल करुनच चौकशी का केली नाही? प्रकरण दाबले तर त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानंतर पोलीसांनी नजर का ठेवली नाही? हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीसांवर कुणाचा दबाव होता का? तक्रारीचा दखल घेण्यासाठी एक महिन्याचा विलंब का झाला? पोलीसांनी दोन्ही कुटुंबाकडून जे लेखी घेतले त्यामध्ये तारखांची खाडाखोड का?
श्रध्दाच्या खूनानंतर तत्कालीन सत्ताधारी पक्षांनी निषेध का केला नाही? असा सवाल करत गोलमाल है…म्हणून चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
