महादेव जानकरांचा ‘यू टर्न’, शरद पवारांना मोठा धक्का; जानकरांची महायुतीला साथ

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीमध्ये जानकर यांना लोकसभेची एक जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी आज ‘यू टर्न’ घेत आपण महायुतीसोबत राहणार असल्याचे सांगितले आहे. जानकर यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.काल (रविवार) महादेव जानकर आणि महायुतीमधील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर महादेव जानकर यांनी महायुतीसोबत राहणार असल्याचे जाहीर केले. महादेव जाणकरांच्या या निर्णयाने शरद पवारांना धक्का बसला आहे. महायुती लोकसभेसाठी रासपसाठी एक जागा सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.या विषयावर माहिती देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, महादेव जानकर यांनी महायुतीतच राहण्याचा निर्वाळा दिला आहे. महायुतीकडून लोकसभेची एक जागा रासपला म्हणजेच महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. योग्य वेळी मतदारसंघाचे नाव जाहीर केले जाईल.

“राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अध्यक्ष महादेव जानकर, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आम्ही सविस्तर विविध विषयांवर चर्चा केली. महादेव जानकर यांनी महायुतीच राहणार असल्याचा निर्वाळा बैठकीत दिला. महायुतीमार्फत लोकसभेची एक जागा रासपला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही एक-दोन दिवसांत महायुतीचं जागावाटप जाहीर करु. त्यावेळी कोणत्या मतदारसंघात रासपला संधी दिली जाईल याबाबत तपशील मिळेल. या निर्णयामुळे महायुती अधिक बळकट होण्यास आम्हाला सहकार्य मिळेलच. राज्यभरात लोकसभा निवडणुकीत त्यांचं मोठं योगदान असेल”, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला

दरम्यान, महादेव जानकर यांचा हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी धक्कादायक ठरला आहे. कारण, पवारांनी माढ्याची जागा महादेव जानकर यांना देऊ केली हेाती. तसेच, जानकर यांनीही माढ्यातून आपण महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. माढ्यातून जानकर यांच्या रूपाने शरद पवार यांना तगडा उमेदवार मिळाला होता. मात्र, महाविकास आघाडीसोबत युतीची घोषणा होण्याच्या आधीच महादेव जानकर यांनी यू टर्न घेतला आहे..