काँग्रेस आमदार राजू पारवे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होताच पारवेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याचं बोललं जात आहे. राजू पारवे लोकसभा निवडणुकीसाठी रामटेकमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणार आहेत, असा दावा राजू पारवे यांनी केला आहे. काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
रविवारी मुंबईत त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसापासून पारवे काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा होती. त्याला आज पूर्णविराम मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महायुतीची सत्ता आली. सरकारकडून अनेक कामांवर स्थगिती देण्यात आली होती. परंतु पारवे यांच्या मतदार संघातील कामांना मंजुरी मिळाली होती.
उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावरून ते काँग्रेस सोडणार असे भाकीत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. मात्र ते शिवसेनेत प्रवेश करून तत्काळ त्यांना लोकसभा उमेदवारी मिळेल वा तसा शब्द पक्षश्रेष्ठींकडून देण्यात येईल, असा अंदाज कुणालाही आला नाही. पारवे यांच्या शिवसेना प्रवेशाने कृपाल तुमाने यांचा राजकीय गेम झाल्याची चर्चा आहे. पुढच्या दोन दिवसांत पारवे यांना अधिकृतपणे लोकसभा उमेदवारी देण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.
विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा पाठवला. पारवे वर्षभरापासून भाजपच्या संपर्कात होते. अशोक चव्हाण यांच्या सोबत ते भाजप प्रवेश करणार होते. मात्र रामटेकचा निर्णय होत नसल्याने ते थांबले होते. अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून सर्व चर्चा आणि अफवांना पूर्णविराम दिला.
