काँग्रेसला मोठा झटका, रामटेक लोकसभा उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या संपूर्ण रामटेक मतदारसंघात जोमात प्रचार करत असताना दुसरीकडे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जात वैधता पडताळणी समितीने हा निर्णय घेतला आहे.त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

रामटेक हा लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. परंतु रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल (२७ मार्च ) संपली. त्यानंतर उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्रावर जात पडताळणी समितीने हा निर्णय घेतला.

रश्मी बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र बनविण्याकरिता जात पडताळणी समितीकडे खोटे दस्तावेज सादर केले व वैधता प्रमाणपत्र मिळवले. त्यामुळे त्यांच्या प्रमाणपत्रांची पुनःश्च तपासणी करुन फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणारी तक्रार जिल्हा जात पडताळणी समितीकडे दाखल करण्यात आली होती. यावर समितीने वेळोवेळी बर्वे यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु बर्वे या समितीसमोर गैरहजर राहिल्या होत्या.अखेर समितीने बर्वे यांच्या घराच्या दारावर नोटीस चिकटवून ही अखेरची संधी असल्याचेही म्हटले होते. यानंतरही रश्मी बर्वे चौकशीला उपस्थित न राहिल्याने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे समितीने जाहीर केले आहे. यावर आता जिल्हाधिकारी निर्णय घेणार असून त्यांनी निकाल राखून ठेवला आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच त्यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद सुरू झाला आहे. सुनील साळवे यांच्या तक्रारीवरून सामाजिक न्याय विभागाने पडताळणी समितीला नियमानुसार कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बर्वे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर रश्मी बर्वे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.केवळ राजकीय फायद्यासाठी विविध पक्षांकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 27 मार्च रोजी होती. त्यामुळे बर्वे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी रामटेकमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन केले. मात्र अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जात वैधता पडताळणी समितीने बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.