भारतातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडला काँग्रेसचा हात

लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. लोकसभेच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे. जस जशा निवडणुका जवळ येत आहेत तसा काँग्रेसला एकामागोमाग धक्के बसत आहेत. आता देशातील सर्वात श्रीमंत महिला आणि टॉप श्रीमंताच्या यादीत नाव असलेल्या सावित्री जिंदल यांनी काँग्रेसचा हात सोडण्याची घोषणा केली आहे. ओपी जिंदल समुहाच्या चेअरमन आणि हरियाणाच्या माजी मंत्री सावित्री जिंदल यांनी बुधवारी रात्री ही घोषणा केली आहे. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहिर केले आहे.

”मी १० वर्षे आमदार म्हणून हिसारच्या जनतेचे प्रतिनिधित्व केले आणि मंत्री म्हणून नि:स्वार्थपणे हरियाणा राज्याची सेवा केली. हिसारची जनता हे माझे कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार मी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या पाठिंब्याबद्दल आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मी सदैव ऋणी राहीन ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा आणि आदर दिला”, असे सावित्री जिंदाल यांनी सांगितले.

सावित्री जिंदाल यांचा मुलगा आणि जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड (जेएसपीएल) चे चेअरमन नवीन जिंदाल यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यातच आता सावित्री जिंदाल यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. नवीन जिंदाल यांना आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री जिंदल यांचे नाव येते. त्यांचे वय 84 आहे आणि या वयातही ते व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, 28 मार्च 2024पर्यंत सावित्री जिंदाल यांची संपत्ती 29.6 अरब डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांनुसार, 2.47 कोटी रुपयांच्या आसपास त्यांची संपत्ती आहे. देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री यांचे नाव सर्वात पहिले येते. तर, जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचे नाव 56व्या स्थानी आहे.

ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल हिसार मतदारसंघातून आमदार आणि 10 वर्षांपासून हरियाणा सरकारमध्ये मंत्री आहेत. जिंदाल यांचे पती आणि जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओपी जिंदाल यांचे 2005 मध्ये विमान अपघातात निधन झाल्यानंतर हिसार मतदारसंघातून हरियाणा विधानसभेवर सावित्री जिंदाल निवडून आल्या.ऑक्टोबर 2013मध्ये त्यांना हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र 2014मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांना हिसारमधून पराभव पत्करावा लागला होता.