मुंबईच्या जागावाटपात विश्वासात घेतलं नाही, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची स्वपक्षावरच नाराजी

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून एकामागे एक भूकंप घडत आहेत. काही बडे नेते पक्ष सोडून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान आठ दिवसांवर आले आहे. त्यानंतर सांगली आणि मुंबईतील जागा वाटपावरुन काँग्रेसमधील नाराजी दूर झालेले नाही. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या धुसफुसीचा परिणाम काँग्रेस पक्षावर झाला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासंदर्भात बुधवारी मोठी बातमी आली होती. त्या कुणाचेच फोन घेत नव्हत्या. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले होते. उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली होती, अशा चर्चा बुधवारी रंगल्या होत्या. त्यावर अखेर वर्षा गायकवाड यांनी आज (११ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी पक्षाने आपणास विश्वासात घेतले नसल्याचं सांगत वर्षा गायकवाड यांनी स्वपक्षावरच नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई कॉंग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस असा नवा वाद उफाळून आल्याचं सध्या दिसत आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ”मुंबईचं जे अस्तित्व आहे ते वेगळं अस्तित्व आहे. मुंबईच्या बाबतीत चर्चा करत असताना आम्हाला काही अपेक्षा होत्या. मुंबईतल्या दोन जागा सोडण्याचं काहीच कारण नव्हतं. मुंबईच्या जागावाटपात मला विश्वासात घेतलं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला पक्ष उमेदवार किंवा पक्ष विजयी झाला पाहिजे. यंदाची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ही निवडणूक लोकशाही तसेच संविधान वाचवण्यासाठीची आहे”, असं गायकवाड यांनी बोलून दाखवलं आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट घेतली आहे. याविषयी बोलताना वर्षा गायकवड म्हणाल्या, घोसाळकर यांचे काही लोक मला भेटून गेले. ⁠दक्षिण मध्य मुंबईत आमची ताकद आहे. जागा आदला बदल केली तर आम्ही स्वागत करु. ⁠मी किती बैठकांना उपस्थित होते हे सर्वांना माहीत आहे. मुंबई जागा वाटपासंदर्भात आणखी काही चांगल करता आलं असते. पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य आहे. मात्र आम्ही ही वस्तुस्थिती हायकमांडला सांगणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हणलं आहे.

दुसरीकडे सांगलीच्या जागेसाठी जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून आग्रह धरला असताना काँग्रेसच्या नेत्यांनी या जागेसाठी विशेष प्रयत्न केले नसल्याची भावना जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. सांगलीत ताकद नसताना उद्धवसेनेने ज्या पद्धतीने सांगलीची जागेसाठी किल्ला लढवला, त्यापुढे काँग्रेसचे नेते कमी पडल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. भिवंडीबाबतही शरद पवार गटाच्या हट्टापुढे काँग्रेसच्या नेत्यांनी नांगी टाकल्याचे काँग्रेसमधील पदाधिकारी सांगत आहेत.