डी. एस. कुलकर्णी यांच्या पुण्यातील कार्यालयावर आणि घरावर ईडीची कारवाई

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केल्याचे वृत्त समोर आले आहे. जंगली महाराज रस्त्यावर असणाऱ्या कुलकर्णी यांच्या कार्यालयात ही कारवाई केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ईडीची दोन पथकांकडून ही छापेमारी सुरू असून, हे पथक मुंबईवरून पुण्यात आलं आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके काही वर्षे पुण्यातील येरवडा कारागृहात कैद होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर आता ईडीकडून अशाप्रकारची छापेमारी केली जात आहे.

डी.एस.कुलकर्णी गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणात अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर ९ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. फसवणुकीची ही रक्कम ८०० कोटींची आहे. या फसवणूक प्रकरणात डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे आणि जावई यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांना अटक झाली होती.

न्यायालयाच्या परवानगीने ही कारवाई सुरू आहे. ऑफिस तसेच बंगला उघडून त्याठिकाणी असलेले कागदपत्र डी. एस. कुलकर्णी यांनी ताब्यात घेण्याची परवानगी मिळावी अशी विनंती डीएसके यांनी कोर्टात केली होती. त्यानुसार डी. एस. कुलकर्णी यांच्या पत्नी हेमांगी त्यांच्या जंगली महाराज रोडवरील ऑफिसमध्ये आल्या आहेत. याठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयाची झडती सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने आणि डीएसके यांनी या प्रकरणाचे संपूर्ण व्हिडिओ शूटिंग करावे, तसेच बंगल्यातील कागदपत्रे घेतल्यानंतर बंगला आणि कार्यालय पुन्हा बंद करण्यात यावे, असे आदेश कोर्टाने दिले होते. डीएसके यांनी बंगल्यातील आणि कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा ते सील करण्यात आले. या प्रकरणास दोन दिवस होत नाही, तोच ईडीच्या पथकाने पुन्हा छापे मारले आहे.

आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान डीएसके यांच्या साधारण 195 स्थाव मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्वांचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या सर्व मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी द्यावी, यासाठी मावळ-मुळशीचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी येथील विशेष न्यायालयात केला होता. त्यावर लिलावामधील योग्य मालमत्तेची यादी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने तीन आठवड्यात तयार करण्याचेही निर्देश दिले आहेत.