उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात मनोमिलन झाल्यानंतर दुसऱ्यांदा हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आले. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीच्यावेळी नेमकं काय-काय ठरलं होतं याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
इंदापुरात बोलताना अजित पवार म्हणाले, देशातील एक नंबरच्या उद्योगपतीच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शरद पवार, मी, खासदार प्रफुल्ल पटेल आम्ही एकत्र बसायचो. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला मंत्रीपद द्यायचं कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री असेल हे ठरलं. पण मुंबईत आल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी निर्णय बदलला. अमित शाहांचा मला फोन आला. तुम्ही शब्द दिला तो तुम्हाला पाळावा लागेल. त्यावेळी मी शब्दाचा पक्का होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घेण्याचं ठरलं. मी शपथ घेतली. नंतर ते सरकार टीकू शकलं नाही”, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.
मी इंदापूरमध्ये बोललो ते ग्रामीण भाषेत बोललो. तेच पुण्यात असतो तर तिथं कचा कचा नाही चालत. ज्या भाषेत चालतं तसेच बोलावं लागते असंही अजित पवार म्हणाले. जे ठरेल तसा महायुती धर्म आपण पाळू असेही अजित पवार म्हणाले. इंदापूरमध्ये संयुक्त सभा असतील त्याला मी उपस्थित राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. इतर पक्ष वेगळे आहेत. पण भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपल्या पक्षात आलबेल असायचे. चला रे चला रे हौशे नवशे गवशे असल्याचे अजित पवार म्हणाले.
अमित शहा यांचा सहकार क्षेत्रातील विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी संपादीत केला आहे. मी महायुतीचा धर्म पाळणार, हा अजित पवारचा शब्द आहे. मी काल बोललो कचाकचा बटन दाबा. मग लोकं म्हणाले की, आचारसंहितेचा भंग झाला. पण अनेक जण काही बोलतात ते भंग होत नाही का? , असा सवाल अजित पवार यांनी केला.भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. एक काम झालं की दुसरं काम, ते झालं की तिसरं काम, पण आमच्या पक्षात मात्र अलबेल नव्हतं. इथे तसं चालत नाही. शिस्त म्हणजे शिस्त. आरएसएसची त्यांना शिकवण आहे. मोदींच्या डोक्यात नेहमी देशाचा विकास असतो. मोदी निवडून आले की संविधान बदलतील अशा थापा विरोधक मारतात. असंही अजित पवार म्हणाले.
