‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत

मंत्री होतो तवा जेवायला बोलवायचे. आता चहा बी पाजत नाहीत अशा रांगडी भाषेत रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत कोल्हापुरात आले होते. सदाभाऊंनी आपल्या खुमासदार शैलीत कोल्हापुरात भाषण केले. मंत्रीपद गेल्यानंतरचे दु:खं सदाभाऊंनी बोलून दाखवले.

“सत्ता वाईट असते. मी भोगली आहे. माझी गाडी आली की, प्रत्येक तालुक्यात मागून दहा-बारा गाड्या लागायच्या. एक किलोमीटर पर्यंत रांग दिसायची. मला वाटायचं, माझं वजन खूपच वाढायला लागलंय. मंत्रीपद गेलं. तसं गाडी पण गेली आणि गाडीवाला पण गेला. मी एकटाच राहिलो. आधी मला रात्री एक-एक वाजेपर्यंत फोन यायचे आणि मी उचलायचो. आता मी त्यांना फोन केले तर कुणी उचलतही नाही. हे खूप वाईट”, अशी खंत माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.

आधी मला एक एक वाजेपर्यंत फोन करायचे. मी उचलायचं. मात्र आता मी फोन केला तर गडी फोन उचलत नाही. मंत्रीपद गेल्यानंतर एकाही खासदाराने मी खुर्ची टाकून बसलेले असताना काच सुद्धा खाली केली नाही. मी मंत्री असताना घरी आले की मी त्यांना सोलापुरी भाकरी, ठेचा, शेंगा चटणी द्यायचो. गडी खाताना म्हणायचा मंत्री बघितलं पण तुमच्यासारखा माणूस नाही. खाणारा गडी खाऊन खाऊन थकून जायचा. मात्र मी सांगायचं त्यांना खाऊ घाला, थोडे कामाला येतात. मात्र आता कुठे कोण आहे? पूर्वी मला जेवायला बोलवायचे. मात्र आता साधा चहा प्यायला हे कोणी बोलवत नाही, असंही ते म्हणाले.

सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली होती. यावेळी महायुतीच्या सरकारमध्ये मात्र, सदाभाऊ खोत यांनी स्थान मिळालं नाही. त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मात्र, महायुतीत शिवसेनेला ही जागा सुटली आहे. पुन्हा सेनेने धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळं सदाभाऊ खोत यांन अनेकवेळा खंत व्यक्त केली आहे.