मुक्ता टिळक गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी आहेत. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे भाजप पक्षाची वैयक्तिक खूप मोठी हानी झालीये.
मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार होत्या.
आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या.
पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्यानंतर 2017 साली त्या पुण्याच्या महापौरपदी विराजमान झाल्या.
यानंतर, महापौरपदावर असतानाच 2019 साली त्यांना भाजपने पुण्याच्या कसबा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं. या निवडणुकीत विजय मिळवून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता.
विधान परिषदेची निवडणूक ही 20 जुलै 2022 ला पार पडली होती. या निवडणुकीसाठी मुक्ता टिळक या आजारी असतानाही पुण्याहून मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी त्यांना चालताना धाप लागायची. पण तरीही त्यांनी आधी पक्षादेश महत्त्वाचा मानला होता.
विशेष म्हणजे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ता टिळक यांना प्रकृती बरी नसल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी न येण्याचा सल्ला दिला होता. पण मुक्ता टिळक या मतदानासाठी मुंबईत विधान भवनात जाण्यावर ठाम होत्या.राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपने जिंकल्यानंतर त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता.
