श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन 15 मार्च पासून बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता 2 जूनपासून वारकऱ्यांना थेट विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. दर्शन बंद ठेवल्यामुळे तेथील व्यावसायिकांवर देखील मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे आता विठुरायांचे दर्शन पुन्हा एकदा सुरु होत असल्यामुळे व्यावसायिक देखील आनंद साजरा करत आहेत.
गेल्या 15 मार्चपासून विठ्ठल रुक्मिणीचे चरण स्पर्श दर्शन बंद होते. कारण मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. हे काम पुढेही 17-18 महिने हे काम सुरु राहणार आहे. पण मंदिराच्या गर्भगृहाचे व चार खांबाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळं येत्या 2 जूनपासून विठ्ठल मंदिर पूर्ववत पदस्पर्शाने सुरु करण्यात येणार असल्याची गहिनीनाथ औसेकर यांनी दिली आहे. 2 जूनपासून 9 जूनपर्यंत ज्या राहिलेल्या कुटी पुजा आहेत, त्या सर्व देवाच्या पुजा होणार आहेत. देवाची तुळशी आणि पाद्य पुजा पर्ववत सुरु होणार असल्याची माहिती औसेकर महाराजांनी दिली.
यावेळी सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करतेवेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, याची दक्षता घेऊन तसेच मूर्ती संरक्षणास प्राधान्य देऊन कामास सुरुवात करण्यात आली. सदरचे काम करत असताना काही नव्याने कामे निदर्शनास आल्याने या कामांसाठी 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे. सदरचे काम पूर्णत्वास येत असून, संवर्धनाचे काम दर्जेदार व पुढील अनेक वर्ष टिकेल या दृष्टीने करण्यात आले आहे. याशिवाय, 2 जून पासून भाविकांच्या शुभहस्ते पूजा देखील सुरू करण्यात येणार आहेत.
