रोहित पवारांचा आत्मविश्वास कमी झालाय; बोगस मतदानाच्या आरोपांवरती पंकजा मुंडेंचं उत्तर

राज्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बीड लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी आज 2 व्हिडिओ ट्विट करत या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोग या प्रकरणी चौकशी करणार की केवळ विरोधकांवरच आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात धन्यता मानणार? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांच्या आरोपांवर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलंय. निवडणूक झाल्यावर रोहित पवार यांनी असं बोलणं हे त्यांचं आत्मविश्वास कमी झाल्याचं लक्षण आहे. आम्ही विरोधीपक्षात असताना त्यांनी 15 आमदार लावले होते, तेव्हा त्यांनी हेच आरोप केले होते, असं पंकजा मुंडे म्हणालेत. बीड लोकसभेसाठी मतदानासाठी पैसे वाटले असा आरोप आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली होता.

परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान झाले असेल तर ज्याची कोणाची तक्रार आहे त्यांनी इलेक्शन कमिशनला करावी. असं घडलं असतं तर मी इथे उभी नसते. रोहित पवारांना उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या. सलग पाचवी निवडणूक आम्ही हॅण्डल करतो आहोत. आम्ही विरोधी पक्षात असताना त्यांनी १५ आमदार लावले होते. निवडणूक झाल्यानंतरही असे आरोप करणे हे त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं दाखवत आहे,आमच्या भाषेत याला चिडी जाण्याचं लक्षण म्हणतात. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, चहाच्या टपरीत काम करणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होतो आणि संविधान आहे म्हणूनच हे होऊ शकतं. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता देशाचा विकास होईल हे सुद्धा मोदी नेहमी म्हणतात. आजची सभा रात्री 12:30 वाजता ठरली. मोदींचं एक मत वाढत असेल तर त्यांचा विजय करण्यासाठी आम्ही कधीही कुठेही जायला तयार आहोत. भारतीताई माझी बहिण तिला निवडून द्या, असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलं.