मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव उलगडणार ‘अटल बिहारी वाजपेयीं’चा जीवनप्रवास; हा अभिनेता दिसेल मुख्य भूमीकेत

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज ९८ वी जयंती. आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अटलजींच्या आठवणी शेअर केल्या जात आहेत. भारताच्या माजी पंतप्रधानांना आजच्या दिवशी या कार्यक्रमांद्वारे सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. दरम्यान बॉलिवूडमधून आजच्या दिवशी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आणि तीही चक्क एका मराठमोळ्या दिग्दर्शकाने शेअर केली. दिग्दर्शक रवी जाधव अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा पुढील वर्षी घेऊन येतायंत.

अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होतेच त्याच बरोबर ते कवी होते. आणि महत्त्वाचं म्हणजे एक सद्गृहस्थ होते. त्यांच्या या वेगवेगळ्या छटांमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी यांचे लूक शेअर करण्यात आले आहे. पंकज यांनीही त्यांच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.अभिनेत्याच्या लूकचे भरभरुन कौतुक होतंय. पंकज त्रिपाठींनी ही भूमिका करत एकप्रकारे शिवधनुष्यच पेलले आहे, त्यामुळे मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार, बॉलिवूडकर आणि प्रेक्षक त्यांचे कौतुक करताना थकत नाहीयेत.

मैं अटल हूँ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. त्यांनी देखील या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट ‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अँड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.