राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारानंतर अजित पवार यांच्याकडे पक्षाची सर्व सूत्रे असल्याचे कार्यकर्ते म्हणतात. अजित पवार आपल्या स्वभावामुळे व कामाच्या शैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे सरकार असताना अजित पवार यांनी अनेक महत्त्वाची खाते सांभाळले आहेत. परंतु अजित पवारांना एक महत्त्वाचं स्वप्न म्हणजे मुख्यमंत्री होण्याचं ते अजूनही पूर्ण झालेलं नाही.
अशातच अजित पवार यांनी आपल्याच पक्षात असताना वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय अनेकदा घेतलेला. 2019 च्या विधानसभेच्या निकालानंतर अजित पवार यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. या प्रकरणानंतर त्यांनी परत राष्ट्रवादीत जाऊन महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद भोगले. अजित पवार हे नेहमी सत्ताकेंद्री दिसून आले.
पण आता पक्षात जयंत पाटलांचं वाढतं प्रस्त बघता अजित पवार यांची कुठेतरी पक्षात घुसमट होते का असा प्रश्न निर्माण होतो?
अनेकदा अजित पवार हे जयंत पाटलांच्या निर्णयाशी किंवा एखाद्या वक्तव्याशी सहमत नसताना आपण बघतो व प्रत्येक जण आपली भूमिका मांडू शकतो परंतु पक्षाची भूमिका नाही असं त्यांनी अनेकदा सांगितलं.
दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशनात अजित पवार भाषण न करताच निघून गेल्याचं खळबळ उडाली होती. यावर सारवासावर देखील करण्यात आली. परंतु या घटनेनंतर असं दिसून आले की राष्ट्रवादीत दोन गट आहेत की काय, हा प्रश्न निर्माण होतोय.
21 जानेवारी 2021 रोजी जयंत पाटील हे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. यावर अजित पवार यांनी जास्त भाष्य न करता आमचा त्यांना पाठिंबा आहे असं बोलत हा विषय थांबवला. जेव्हा अजित पवार विरोधी पक्ष नेते झाले त्यावेळेस देखील अशी चर्चा होती की विरोधी पक्षनेते पद जयंत पाटलांना हवं होतं. जयंत पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. अजित पवारांप्रमाणेच जयंत पाटलांनी देखील अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.
नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटलांच्या निलंबनावर जी भूमिका घेतली यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे म्हटलं जात आहे अजित पवार यांनी सभागृहात माफी मागून जयंत पाटलांची चूक मान्य केली. याउलट अजित पवार यांनी कठोर भूमिका घ्यायला हवी असं शरद पवार म्हणाले असं माध्यमात दाखवलं जातं. शरद पवार यांनी फोनवर अजित पवारांशी संवाद साधला. हे सर्व घटनाक्रम बघता अजित पवार यांची कुठेतरी पक्षात घुसमट होते हे मात्र निश्चितच आहे.
