पंतप्रधान नरेंद मोदी वाराणसीतून साधणार ‘स्त्री शक्ती’ संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी वाराणसी येथील काशी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर 25 हजार महिलांशी संवाद साधणार आहेत. यावर भाजपचे काशी प्रदेशचे प्रवक्ते नवरतन राठी यांनी माहिती दिली की, वाराणसी लोकसभेत 1,909 बूथ आहेत. पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी प्रत्येक बूथवरून 10 महिलांना बोलवण्यात आले आहे. भाजपच्या राज्य युनिट सचिव आणि महिला मोर्चाच्या प्रभारी अर्चना मिश्रा यांनी सांगितले की, भाजपच्या महिला विंगच्या सदस्य वाराणसीमध्ये घरोघरी जाऊन महिलांना मंगळवारच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करत आहेत. यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर जाणार असून तेथे ‘स्त्री शक्ती’ सोबत संवाद साधणार आहेत.येत्या १० दिवसांत मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सायंकाळी साडेचार वाजता मोदी वाराणसी येथील डॉ.संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात मातृशक्ती परिषदेला संबोधित करणार आहेत. यावेळी कार्यक्रमात तब्बल 25 हजार महिला सहभागी होणार आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाकडून एवढ्या मोठ्या संख्येने महिला संमेलन आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमातील सर्व जबाबदाऱ्या महिलाच सांभाळणार आहेत. तसेच भाजपाने वाराणसी लोकसभा मतदारसंघातील सर्व 1,909 बूथमधून महिलांचा सहभाग सुनिश्चित केला आहे. त्यामुळे या सभेला विशेष राजकीय महत्त्व आहे.

महिला मोर्चाच्या प्रभारी अर्चना मिश्रा म्हणाल्या, 13 मे रोजी त्यांच्या काशी रोड शोमध्ये आमच्या उत्साही सहभागाने पंतप्रधानांना खूप आनंद झाला आणि त्यामुळेच ते आमच्यासोबत त्यांचा आनंद शेअर करण्यासाठी पुन्हा इथे येत आहेत. या कार्यक्रमासाठी डॉक्टर, इंजिनीअर, वकील, प्राध्यापक, चार्टर्ड अकाउंटंट आणि शिक्षकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत, स्टेज व्यवस्थापन आणि कार्यक्रमातील इतर व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी नारीशक्तीच्या खांद्यावर आहे. पंडालमध्ये मिनी इंडियाचे रूपही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मोदीजी महिलांना काय संदेश देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.