डोंबिवलीत असणाऱ्या एमआयडीसी परिसरात आज (२३ गुरुवार) दुपारी भीषण स्फोट झाला. या स्फोटाचे नेमके कारण आणि तीव्रता अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, डोंबिवली एमआयडीसीपासून लांबच्या अंतरावर असलेल्या परिसरातूनही आकाशात उठत असलेले काळ्या धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत आहेत. यावरुन स्फोटाची तीव्रता जास्त असल्याचा अंदाज बांधला जात आहे. एमआय़डीसीतील कंपनीतील बॉयलरमधे ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचे सांगितले जाते.
आगीची भीषणात पाहून उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथून अग्नीशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. डोंबिवली तापमान ४२ अंश सेल्सियस आहे. वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. स्फोट झाल्यानंतर अनेक वस्तू हवेत उडाल्या. आगीची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.
डोंबिवली परिसरात झालेल्या या भीषण स्फोटामुळे एमआयडीसी परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण २४ मे २०१६ मध्ये डोंबिवली एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट झाला होता. यावेळी १२ जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. ज्या कंपनीत हा स्फोट झाला होता, त्यात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे मृतदेहदेखील सापडले नव्हते. त्यावेळी काही किलोमीटर परिसरात स्फोटामुळे हादरे जाणवले होते. या स्फोटाचा आवाजही दूरपर्यंत गेला होता. यावेळी अनेक इमारतींच्या काचा फुटल्या होता. अनेक इमारतींना तडे गेले होते.
या स्फोटानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे. तसेच या स्फोटात ५ ते ६ कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एमआयडीसमध्ये स्फोट झाल्यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाचे अग्निबंब देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
