पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघातातर वातावरण चांगलंच तापलं आहे. एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कार चालवून बाईकला धडक दिली आणि त्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला. या घटनेमुळे पुण्यातीलच नव्हे देशभरातील नागरिकांनी व्यक्त करत दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पुण्यातल्या अपघातानंतर आता विरोधकांनी सरकारला,पोलिसांना घेरलं आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरेंना सवाल केले जात आहेत. तर कलम 304 लावण्यावरुन धंगेकरांनी गृहमंत्री फडणवीसांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला. या सर्व पाश्वभूमीवर आता आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांचा कायम राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.
’नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे ताई गप्प का आहेत ? शरद पवार गटातून याबद्दल काहीच प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही ? प्रत्येक गोष्टीवर, उठसूठ देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे या पुण्याच्या घटनेवर मात्र गप्प का ? त्यांचे या घटनेतील कुटुंबाशी संबंध होते का ? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का ? कारण आरोपीला जो वकील देण्यात आला आहे, तो पवार साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय असल्याचे समजते,’ असा आरोप नितेश राणे यांनी केला.
महाराष्ट्रात जाणीवपूर्वक मतदान कमी व्हावं म्हणून प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला, या विषयी बोलताना नितेश राणे म्हणाले, निवडणूक आयोग आपल्या भारतात लोकशाही टिकवण्याचे काम करत आहे. हे हिरवे वळवळणारे साप आता आले आहेत. हरणार हे माहीत आहे. म्हणून बळीचा बकरा निवडणूक आयोगाला केले जात आहे, असे नितेश राणे म्हणाले. तसेच आशिष शेलार यांची तक्रार रास्त आहे. पराभव समोर दिसू लागल्याने शेमड्यासारखे उद्धव ठाकरे रडत आहेत. निवडणूक लढविण्याची लायकी नसल्याने नाक रडगाण्याचे काम सुरु आहे, अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.
