काळाजी घ्या, राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट, हवामान विभागाकडून महत्वाचे अपडेट

देशात यंदा मान्सून वेळेवर येण्याची चिन्ह दिसत आहे. मान्सून अंदमान निकोबारमध्ये १९ मे रोजीच पोहचला आहे. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या प्रगतीकडे सर्वांचे डोळे लागले असताना राज्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. २६ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. हवामान खात्याकडून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असून नागरिकांनी काळजी घेण्याच आवाहन करण्यात आला आहे.

देशांत बुधवारी हरियाणातील सिरसा येथे सर्वाधिक ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, महाराष्ट्रात जळगावमध्ये ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावा लागत आहे.नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून परळीत तापमान ४३ अंशावर पोहोचले आहे. गेल्या तीन दिवसांत तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक हैराण आहेत. राज्यात वाढलेल्या ऊन्हामुळे एससी, कुलचा वापर प्रचंड वाढला आहे. यामुळे वीजेची मागणी प्रचंड वाढली आहे. बुधावारी मुंबईत ४३०० मेगावॅट वीज खर्च झाली. मुंबईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विजेचा वापर झाला.

सध्या संपूर्ण देशात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मान्सून बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांचा आणखी काही भाग व्यापणार आहे. त्याचबरोबर केरळच्या दक्षिण भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे लगतच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.