पंडित नेहरू शहाणा माणूस मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर? संजय राऊतांनी नाकारले डॉ. आंबेडकरांचे घटनेतील योगदान!

विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसच्या आहारी गेल्याने पंडित नेहरू यांची हांजी हांजी करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय घटना धर्मनिरपेक्ष असल्याचे श्रेय पंडित नेहरू यांना देत डॉ. आंबेडकरांचे योगदान नाकारले आहे. ( Pandit Nehru was a wise man, then Dr. Babasaheb Ambedkar? Sanjay Raut denied Dr. Ambedkar’s contribution to the Constitution)
‘ सामना ‘ या शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रात संजय राऊत यांनी  रोखठोक या सदरात  ‘देश हिंदू-पाकिस्तान’च्या दिशेने’ लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. मात्र गंभीर बाब म्हणजे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. भारतात सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता. भारतीय मुसलमान आणि भारतीय हिंदू ही दोन वेगळी राष्ट्र आहेत. त्यांचे आपले स्वतंत्र धर्म, परंपरा, रीतिरिवाज आहेत. त्यामुळे सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून मुसलमानांना हिंदूबहुल भारताबाहेर आपली वेगळी मातृभूमी निर्माण करण्याचा अधिकार असायला हवा, असे त्यांचे म्हणणे होते. डॉ. आंबेडकर यांनीही एकदा सांगितले होते की, “येथे हिंदू आणि मुसलमान अशी दोन स्वतंत्र राष्ट्र नांदताना दिसत आहेत.” मात्र, पंडित नेहरू या शहाण्या माणसाने ठोकून जाहीर केले, “देशाची घटना धर्मनिरपेक्षच राहील. मी भारताचे हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही.
डॉ. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्यभर धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला. प्रत्येक भारतीय नागरिक हा धर्मनिरपेक्ष बनावा, अशी त्यांना माफक अपेक्षा होती. मानवी जीवनाला धर्मनिरपेक्षतेचे अधिष्ठान असल्यास धार्मिक प्रदूषण टाळले जाऊन सर्वधर्मसमभाव निर्माण होतो आणि लोकशाही बळकट होते. धर्माचे प्राबल्य नष्ट झाल्याने सामाजिक विषमता नष्ट होईल, असे त्यांचे मत होते.
धर्मनिरपेक्षता हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानात आवश्यक वाटत होता की, त्यांचा त्या शब्दाला विरोध होता याचे संविधानसभेतील दाखले देऊन संसदेत वादंग निर्माण झाले आहेत. आता संजय राऊत यांनी येथे हिंदू आणि मुसलमान अशी दोन स्वतंत्र राष्ट्र नांदताना दिसत आहेत, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विधान गैरहेतूने केले आहे. पंडित नेहरू यांचेच देशाची घटना तयार करण्यात महत्वाचे योगदान होते असे दाखविण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला आहे. डॉ. आंबेडकर यांचा संदर्भ देत पंडित नेहरू हा शहाणा माणूस म्हणण्यामागचे कारण काय असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *