मुंबई : एका बाजुला औरंगजेबाचे गुणगान करताना राज्यातील जातीय सलाेखा दूषीत करण्याचा डाव जितेंद्र आव्हाड यांनी सुरू केला आहे. भीमा काेरेगाव युध्दात नियतीने पेशवेंवर सूड घेतला हाेता, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबराेबर छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला दिली कुणी? इथेच तर खरा इतिहास आहे, असे म्हणत राज्यातील जातीय राजकारण पुन्हा सुरू करण्याचा आव्हाड यांचा प्रयत्न आहे.
निवडणुका ताेंडावर आल्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेस राज्यातील जातीय सलाेखा बिघडविण्याचा प्रयत्न करते. ब्राम्हण- मराठा वाद उकरून काढते असा आजपर्यंतचा या पक्षाचा इतिहास आहे. जेम्स लेन प्रकरणातही त्यांनी तेच केले हाेते. आता राष्ट्रवादीने पुन्हा ही जबाबदारी आव्हाड यांच्यावर साेपविली आहे.
गेल्या दाेन दिवसांतील आव्हाड यांची ट्विट जातीय विखार दाखविणारी आहेत. काेरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादनाच्या निमित्ताने केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भीमा कोरेगावचे युद्ध म्हणजे फक्त युद्ध नाही तर नियतीने पेशवेंवर घेतलेला सूड होता. ज्यांनी अस्पृश्यता पसरवली, शोषण केले व समाजातील एका मोठ्या घटकाचे जीवन असाह्य केले; त्यांना नियतीनेच धडा शिकवला आणि अखेरीस पेशवाई रसातळाला गेली. या इतिहासाची पाने कधीच पुसली जाऊ शकतं नाही.
अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसल्याच्या वक्तव्यानंतर राज्यभर आंदाेलने सुरू झाली. अजित पवार यांच्यावर चहूबाजुंनी टीका हाेत आहे. यामध्ये मुळ मुद्दा बाजुला करून जातीय राजकारण करण्यास आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्या पासूनच स्वराज्य रक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला दिली कुणी? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो.”
मुळात यातून आव्हाड काेणाला धमकी देत आहेत हे स्पष्ट हाेत आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर राष्ट्रवादी जातीय राजकारणाचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने आव्हाड यांची वक्तव्ये सुरू आहेत.
