राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज मंगळवारी सुनावणी पार पडली. ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावरील ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. 14 फेब्रुवारीलाच सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठापुढे पाठवायचं की नाही, हे निश्चित सांगेल.

सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम.शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोेहली आणि न्यायमूर्ती पी.एस.नरसिंह यांच्या घटनापीठापुढे हे संपूर्ण प्रकरण आहे. हा मुद्दा सात सदस्यीय घटनापीठापुढे गेल्यास त्यावर निर्णय होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
१४ फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सलग ही सुनावणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. तसेच, व्हॅलेंटाईन डे अर्थातच १४ फेब्रुवारी या दिवशी सुनावणी असल्याने सर्वकाही प्रेमाने होईल, असेही शिवसेनेकडून सांगण्यात आले.
राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल विविध मुद्यांवर ठाकरे गटाला या खटल्यात सात न्यायमूर्तींचे खंडपीठ हवे आहे. त्यात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत मुख्य मुद्दा आहे. विधानसभेचे पीठासीन अध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल असताना त्यांना हा अधिकार आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जूनपासून एकूणच शिवसेना पक्ष कुणाचा आणि सत्ता नेमकी कुणाची याविषयी न्यायालयात वाद सुरु असताना आता न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा एकदा १४ फेब्रुवारी पर्यंत ढकलले आहे. एकूणच या प्रकरणात पुढे काय होतं हे बघणं आता मबत्वाचं ठरणार आहे.
