राजकीय नेत्यांमागचं अपघाताचं शुक्लकाष्ठ काही संपण्याचं नाव घेत नाहीये. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात झालेला आहे. पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करायला जात असताना काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने धडक दिलीये. या धडकेत दीपक सावंत जखमी झाले आहेत. अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पालघर येथील आश्रम शाळेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी दीपक सावंत हे पालघरकडे निघाले होते. पालघरला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. एका भरधाव डंपरने दीपक सावंत यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.
डॉक्टर दीपक सावंत हे सकाळच्या सुमारास पालघरकडे रवाना झाले. दीपक सावंत यांची कार काशिमिरा परिसरात पोहोचली तेव्हा त्यांच्या कारला डंपरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच दीपक सावंत यांच्या पाठीला आणि मानेलाही दुखापत झाली आहे.
