मुंबई : होतकरू तरूणांचा राज्याच्या प्रशासनाशी सुसंवाद वाढावा, विकासाच्या संकल्पना, अभिनव उपक्रम राबवण्यात त्यांचा सहभाग घेता येईल यासाठी यापूर्वी राबविण्यात आलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२३-२४ पासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. यापूर्वी राबविलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरू करताना आणखी नवसंकल्पनांचा समावेश करण्यात यावा. हा कार्यक्रम लवकरात-लवकर सुरू करण्याचे नियोजन करण्यात यावे. यामध्ये राज्यातील उच्चशिक्षण,संशोधनात कार्यरत संस्थांचाही सहभाग घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे उच्चशिक्षित आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ तरूणांना नाविण्यपूर्ण संकल्पना घेऊन शासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री फेलोशिपच्या अंमलबजावणी बाबत लवकरच सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
राज्यातील पदवीधरांना विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ‘मुख्यमंत्री फेलोशिप’ योजना सुरू केली होती. मध्यतंरीच्या काळात मविआचे सरकार आले तेव्हा हा कार्यक्रम बंद होता. आता राज्यात सत्तापरिवर्तन झाले अनेक स्थगित प्रकल्पना नव्याने सुरु करण्यात आले तसेच हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम ग्रामीण विकासाच्या व उत्थानाचा अनुषंगानने महत्वपूर्ण असणारा हा कार्यक्रम पुन्हा नव्याने सुरु करण्यात आला.
या अंतर्गत २१ ते २६ वयोगटातील तरुणांना १२ महिन्यांसाठी काम करण्याची संधी मिळणार असून, दरमहा ७० हजार रुपये छात्रवृत्ती, तर पाच हजार रुपये प्रवास भत्ता देण्यात येणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि पदवुत्तर शिक्षण झालेल्या उमेदवारांना किमान ६० टक्के गुण असलेल्या तरुणांना या फेलोशिपसाठी अर्ज करता येईल. नामांकित उपक्रमात एक वर्ष काम केले असेल तर अशा तरुणांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच संगणकातील ज्ञानही गरजेचे असेल.
या फेलोशिपसाठी ६० तरुणांची निवड करण्यात येईल. त्यापैकी महिला फेलोंची संख्या ही फेलोंच्या एकूण संख्येच्या १/३ राहील. १/३ महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल.
निवडीची कार्यपद्धती
फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. त्यानंतर वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा (ऑनलाईन टेक्स्ट) द्यावी लागेल. ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक आहे. देशातील प्रमुख शहरे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. पुढे मग वस्तुनिष्ठ चाचणीतील उमेदवारांना पुढल्या फेरीसाठी पात्र ठरल्यावर ऑनलाइन निबंध सादर करावे लागेल. त्यानंतर पुढील राउंड मध्ये जाणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती होतील व निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रात आपल्या आवडीचे करिअर निवडताना या कार्यक्रमातील सहभागाचा निश्चितच उपयोग होईल. शेवटी मिळणारं सर्टिफिकेट व्यावसायिक वाटचालीत महत्त्वाचं असेल.
