समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात इसमाने आझमी यांच्या पीएला फोन करून आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आझमी यांना शिवीगाळही केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या धमकी प्रकरणी अबू असीम आझमी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादवी कलम 506 (2) आणि कलम 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, धमकीच्या संदर्भात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईचे पोलिस सक्षम आहे. त्यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल. मुंबई सुरक्षीत असल्याचे दिपक केसरकर म्हणाले. या मुंबईमध्ये महिला रस्त्यावरुन फिरु शकतात हे मुंबईचे वैशिष्ट्य आहे. ते आपण जपलं पाहिजे असेही दिपक केसरकर म्हणाले. हे सगळं करत असताना पोलिस प्रशासनाची मदत आम्ही घेतो. रात्रीचे निवारे आम्ही आता तयार करणार आहोत, असेही केसरकर म्हणाले. आमचे मिशन मुंबई असल्याचे केसरकर म्हणाले.
बुधवारी संध्याकाळी हा धमकीचा फोन आला होता. आझमी यांच्या पीएला फोन करून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी अज्ञात इसमाचा शोध घेतला जात असून धमकी कुठून आली? यामागे कोण आहे? याचीही माहिती घेतली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
