कसबा अन् चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया

पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या ठिकाणी निवडणुका बिनविरोध होणार की थेट निवडणूक होणार याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसतेय. कारण विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. यावेळी ते म्हणाले, सोमवार-मंगळवारी मुंबईत बसून महाविकास आघाडी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा करणार आहे. कारण मविआतील इतर घटकपक्षांची आणि नेत्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु.चा पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी पवारांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

चिंचवड विधानसभेसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे विठ्ठल काटे यांनी सांगितले. त्यासाठी चिंचवड मधील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेवून विठ्ठल काटे यांना तिकीट मिळावे यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे मागणी केली जाणार आहे.

महाविकास आघाडीमध्ये काही नवीन प्रश्न उभे राहतील, अशी वक्तव्य करणार नाही. सत्यजीत तांबे यांच्याबाबत नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात बोलले आहेत. जे घडलं ते पुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाला इतर पक्षांनी मदत करावी, असं अजित पवार म्हणाले.