माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत बाळासाहेबांच्या जयंतीला २३ जानेवारी रोजी संपत आहे. मुदत वाढवून देण्यासाठी तसेच पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबत निवडणूक आयोगाकडे केलेल्या अर्जावर कोणताच निर्णय न झाल्याने ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला आहे. पुढचे पाऊल काय टाकायचे, याबाबत खलबते सुरू झाली आहेत.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाची मुदतही संपुष्टात येत आहे. यामुळे २३ जानेवारीनंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का? हाच मोठा प्रश्न ठाकरे गटच नाही तर राज्यातील राजकीय वर्तुळात आहे. यासंदर्भात रविवारी शिवसेनेकडून मोठी घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जाते.
मूळ शिवसेनेच्या घटनेनुसार २३ जानेवारी २०१८ रोजी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या. या निवडणुकीत उद्धव यांच्याकडे ५ वर्षे पक्षप्रमुखपद देण्यात आले होते. ही मुदत २३ जानेवारी २०२३ रोजी पुर्ण होत आहे. एकीकडे मुदत पुर्ण होत असताना शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगात आहे. या वादावर ३० जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. आतापर्यंत दोन सुनावणी झाली. आता लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश आयोगाने दोन्ही गटांना दिले आहे.
या दरम्यान पक्षातंर्गत निवडणुका घेऊ देण्याची मागणी ठाकरे गटाने आयोगाकडे केली होती. परंतु आयोगाने त्यावर कोणताही निर्णय दिला नाही. शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपल्याने तांत्रिकदृष्ट्या उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नसणार आहेत.
