सत्तेसाठी बाळासाहेबांच्या जवळच्या व्यक्तींना लांब ठेवायचं असा विचार करणाऱ्यांना शिवसेना म्हणण्याचा अधिकार नाही-मंत्री दीपक केसरकर

धनुष्यबाण हे बाळासाहेबांचे आहे आणि त्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कल्याणमध्ये बोलताना व्यक्त केला तसेच त्यांनी भारत जोडे यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेचा आम्हाला पाठींबा असल्याचे केसरकर यांनी सांगितले. भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचार सभेत मनसेचे आमदार राजू पाटील यांचा फोटो लावण्यात आला होता. मात्र, कालच आमदार पाटील यांनी अजुन पाठींब्याचा निर्णय झाला नसल्याचे म्हटलं होतं. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होणार हे निश्चित आहे, मागील सरकारच्या काळात पण त्याला उशीर झाला होता असे देखील केसरकर म्हणाले. केसरकर कोकण शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचार सभेसाठी कल्याण मध्ये आले होते.

पुढे बोलताना ज्या लोकांनी बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवले, सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला नेवून आपल्या कार्यकर्त्यांना बांधलं. ते बाळासाहेबांना कदापि आवडलं नसतं.बाळासाहेबांनी असं म्हटलं होतं की मला एक दिवसाचा पंतप्रधान करा मी काश्मीर चे ३७० चे कलम रद्द करतो आणि त्याच काश्मीर मध्ये जावून ज्यावेळी शिवसेना काँग्रेसचे स्वागत करते तेव्हा बाळासाहेबांना काय वाटलं असेल असा टोला संजय राऊत यांना लगावला. पुढे बोलताना केसरकर यांनी ३७० कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी ,अमित शहा यांनी रद्द केलं. बाळासाहेबांबद्दल त्यांना असलेले प्रेम हे मी स्वतः अनुभवलेले आहे. बाळासाहेबांच्या जवळच्या असलेला व्यक्तीला लांब ठेवायचं, त्यांच्या विचारणा लांब ठेवायचं हा विचारच जे लोक करू शकतात त्यांना स्वतःला शिवसेना म्हणण्याचा अधिकार नाही अशी टीका ठाकरे गटावर केली .

आमदार नाराज होतील म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही असा आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर करण्यात येत आहे. याबाबत बोलताना केसरकर यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे शंभर टक्के आहे. पूर्वी सुद्धा अनेक वेळा असं घडलं त्यांच्या काळात आमच्यापेक्षा जास्त काळ पहिला विस्तार झाला नव्हता. दुसरा विस्तार तर दोन-दोन वर्षे झालं नव्हता. आम्हाला फक्त सहा महिने झालेत. आमचे पहिलं कर्तव्य लोकांना न्याय देणे हे आहे. त्याच्यामुळे आमच्या सर्व आमदारांनी सांगितलं होतं फक्त आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असावे किंवा भाजपच्या लोकांनी सांगितले देवेंद्र फडणवीस असावेत आम्ही सगळे लोक मंत्री झाल्यासारखे आहोत ही भावना घेऊन जे आमदार काम करतात त्यांची विनाकारण बदनामी करायची त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं हे खरोखर चुकीचं आहे. योग्य वेळेला या सगळ्याचे उत्तर मी प्रवक्ता म्हणून निश्चितपणे देणार असल्याचे सांगितले.

शिवजयंती पूर्वी सरकारमध्ये उलथापालथ होणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो. याबाबत बोलताना केसरकर यांनी ते दावे नेहमीच करतात त्यांचे दावे नेहमी फोल ठरतात. स्वप्न बघण्यात काही चुकीचं नसतं जे झोपतात ते स्वप्न बघतात. त्यामुळे त्यांनी स्वप्न बघत राहावेत, आम्ही जागे राहून जनतेसाठी काम करत राहू असं मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचे असे त्यांनी सांगितले.

राजकीय अपरिहार्यता म्हणून कदाचित मनसे आमदार बोलले असतील.
शिक्षक मतदार संघात कुणाला पाठिंबा देणार याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी अद्याप आदेश नसल्याचे सांगितलं होतं, मात्र आज बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासाठी झालेल्या सभेत मनसे आमदार राजू पाटील यांचा बॅनर वर फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. याबाबत बोलताना केसरकर यांनी सगळ्यांच्या मनामध्ये आमचा उमेदवार आहे. त्याच्यामुळे काही राजकीय अपहार्यता असते म्हणून त्यांनी असं म्हटलं असेल त्याचा पाठिंबा सुद्धा आम्हाला असेल याची मला खात्री आहे असा दावा केला.