पुणे : धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात ५० हजारहून अधिक हिंदू नागरिक सहभागी झाले होते.
महाराष्ट्रात आणि देशात लव्ह जिहाद, सक्तीचे धर्मांतरण आणि गोहत्या ह्या चिंताजनक आणि वाढत्या घटनांच्या विरोधात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी ह्या मोर्चाद्वारे हिंदू समाजाकडून करण्यात आली. ह्या वेळी जनसमुदयाला संबोधित करताना जाती, धर्म, पंथ, गोत्र बाजूला ठेवून सकल हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज आहे असे तेलंगणनाचे आमदार राजा भैय्या यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणून घोषित करावे आणि त्यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा अशी आग्रहाची मागणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्य सरकारकडे केली. यावेळी ‘तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिवाजीराव मोरे, शिवशंभू अभ्यासक नीलेश भिसे, पतीत पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, धिरज घाटे, हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांनी मोर्चाला संबोधित केले. महाराष्ट्रात आणि देशात लव्ह जिहाद, सक्तीचे धर्मांतर आणि गोहत्या विरोधात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी एकमुखी मागणी सर्व मान्यवरांनी केली.
मोर्चात शहरातील सर्व राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे सहभागी झाले होते. मोर्चातील महिलांचा प्रचंड सहभाग लक्षणीय होता. तसेच वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने विराट दर्शन आज घडले.
