मी गद्धार नाही, सामनामध्ये जाहिरात देण्याची संजय आणि सुनील राऊत यांच्यावर वेळ

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्यावर सामनामध्येच मी गद्धार नाही अशी जाहिरात देण्याची वेळ आली आहे. त्यांच्याबरोबरच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही जाहिरात दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे. या निमित्ताने संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्या नावाने सामनाच्या पहिल्याच पानावर जाहिरात देण्यात आली आहे. साहेब, मी गद्दार नाही. गेलेल्या चाळीस गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना होईल, असे या जाहिरातीत म्हटले आहे.

मुळात सामनाचे संपादक असलेल्या संजय राऊत यांना ही जाहिरात देण्याची वेळ का आली. त्यांच्या बरोबरच त्यांचे बंधू सुनील राऊत यांचेही नाव का आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचे कारण म्हणजे संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात सुनील राऊत यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्याचबरोबर सुटका व्हावी यासाठी संजय राऊत यांनी काही अटी मान्य केल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या मनात त्यांच्याविषयी संशय निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आपली एकनिष्ठता दाखविण्यासाठी अगदी व्यावसायिक दराने पैसे मोजून त्यांनी जाहिरात दिली आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना सोडून लोक का जात आहेत यावर आत्मचिंतन करावे असे वक्तव्य केले होते. त्या शिवसेना सोडुन शिंदे गटात जाणार अशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांनीही जाहिरात देऊन संशय नका धरू मनी असे म्हटल्याचे बोलले जात आहे. एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात असे त्यांनी या जाहिरातीत म्हटले आहे. हे सांगून त्यांनी शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात असे सांगून त्यांनी आपण शिवसेना सोडणार नाही असेच म्हटले आहे का? असे विचारले जात आहे. याचे कारण म्हणजे अगदी दलित पँथरपासून त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे.