गोखले बिल्डरवर २३० कोटींच्या जमीन गैरव्यवहाराचा आरोप, एसएचएनडी जैन वसतिगृह प्रकरणी माजी विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालयात

विशेष प्रतिनिधी

पुणे : मॉडेल कॉलनीतील ऐतिहासिक सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन वसतिगृह (SHND Hostel) विक्रीच्या निर्णयाविरोधात आजी माजी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गोखले लँडमार्क एलएलपी आणि जैन हॉस्टेल विश्वस्त मंडळाविरोधात जमीन बळकावण्याचा आरोप करण्यात आला आहे. ( Gokhale Builder accused of land scam worth Rs 230 crore former students move Bombay High Court in SHND Jain Hostel case)

१२,००० चौरस मीटरचे हे भूखंड जैन विद्यार्थ्यांसाठी राखीव असून, १९५८ च्या ट्रस्ट डीडचे उल्लंघन करून विक्री करण्यात येत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.असोसिएशन ऑफ एसएचएनडी होस्टेल अल्युमनी (ASHA) यांनी अॅड. योगेश पांडे यांच्या मार्फत दाखल केलेल्या या याचिकेत, धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या ४ एप्रिलच्या विक्री मंजुरी आदेशाला आव्हान देण्यात आले आहे.

ट्रस्टकडे ₹९.७ कोटींचा शिल्लक , ₹९.१६ कोटींची मुदतठेवी, तसेच मंदिरातून नियमित देणग्या येत असताना निधीअभावी विक्रीचा दावा खोटा असल्याचे याचिकेत नमूद केले आहे. गेल्या वर्षी ₹८ कोटी रुपये गुपचूप जमिन खरेदीसाठी वळवले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. होस्टेलची इमारत रचनात्मकदृष्ट्या मजबूत असून, ६५ वर्षे जुने महावीर मंदिर दुर्लक्षित करून क्लिअरन्स देण्यात आल्याचा आरोप आहे.

नव्या आराखड्यानुसार ट्रस्टला केवळ १०,००० चौरस फूट जागा ९९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर मिळणार आहे. त्यामुळे खेळाची मैदाने, सांस्कृतिक सभागृह आणि विद्यार्थ्यांची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होईल.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे नेते अक्षय जैन यांनी इशारा दिला आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि समाजाच्या वारशासाठीची ही लढाई आहे. जर निधीची गरज असेल, तर आम्ही तो उभा करू. पण ही विक्री आम्ही कधीही सहन करणार नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *